अक्षय कामठे यांनी सांगितलं की, आध्यात्मिक शांती अनुभवण्यासाठी त्यांनी नर्मदा परिक्रमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या आई-वडिलांनी देखील ही परिक्रमा पूर्ण केली आहे. त्यांच्या आदर्शानुसार त्यांनी पायी परिक्रमा करण्याचा निर्धार केला आणि ती यशस्वीरित्या पूर्ण देखील केली. अक्षय कामठे यांच्या घराण्याला पाच ते सहा पिढ्यांची आध्यात्मिक आणि वारकरी परंपरा लाभलेली आहे. वडिलांनी दाखवलेल्या भक्ती, साधना आणि संतमार्गावर चालण्याच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केल्याचं सांगितलं.
advertisement
3 हजार 600 किमी पायी नर्मदा परिक्रमा
ही परिक्रमा ओंकारेश्वर–विमलेश्वर–मिठीतलाई–अमरकंटक आणि परत अमरकंटक–ओंकारेश्वर या पारंपरिक मार्गाने पूर्ण करण्यात आली. तीन महिन्यांत त्यांनी तब्बल 3,600 किलोमीटर पायी चालत प्रवास केला आहे. ही परिक्रमा 3 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू झाली आणि 12 जानेवारीला संपन्न झाली. नर्मदा परिक्रमा ही फक्त प्रवास नाही, तर एक कठीण आध्यात्मिक साधना आहे. या तपस्येची दखल घेत, श्री भक्ती आश्रम, गोमुख घाट, ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथील आचार्य श्री अनिलदास (अभिरामदास) योगीराज यांनी अक्षय कामठे यांना अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले. सध्याच्या धावत्या युगात स्वतःला शोधण्यासाठी आणि मनाला शांती मिळवण्यासाठी त्यांनी ही परिक्रमा केल्याचं सांगितलं. प्रत्येकांनी आयुष्यात एकदा तरी ही परिक्रमा करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.





