वाचन हे केवळ ज्ञानवृद्धीचे साधन नसून, विचारशक्ती वाढवणारे आणि जीवनात योग्य दिशा देणारे माध्यम आहे. याच जाणीवेतून लेशपाल जवळगे यांनी बीड या जिल्ह्यात वाचन क्रांती घडवण्याचा संकल्प केला. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडची ही प्रतिमा बदलून वाचणारा बीड अशी नवी ओळख निर्माण करण्याचे काम या उपक्रमाद्वारे सुरू आहे.
advertisement
या चळवळीच्या माध्यमातून अनेक शाळा या उपक्रमाशी जोडल्या गेल्या असून, 10 हजारांहून अधिक पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 850 शाळांना या अभियानात समाविष्ट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून साडेतीन लाख विद्यार्थी वाचन मोहिमेत सहभागी होतील, अशी माहिती लेशपाल जवळगे यांनी दिली.
वाचनामुळे जीवनात बदल घडू शकतो, असा ठाम विश्वास बाळगून जवळगे यांनी या मोहिमेला लोकचळवळीचे रूप दिले आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पुस्तक वाचन स्पर्धा, कार्यशाळा आणि प्रेरणादायी सत्रांचे आयोजन केले जात आहे. याशिवाय वाचनात रस दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे आणि दिल्ली येथे भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष ज्ञान आणि प्रेरणा मिळेल.
या उपक्रमासाठी पुस्तक संकलन मोहीम राबवली जात आहे. पुणे सह इतर विविध शहरांतून स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात पुस्तक दान केल्याने आजवर 10 हजारांहून अधिक पुस्तके जमा झाली आहेत. अनेक नामवंत लेखक, प्रकाशक आणि सामाजिक संस्था या चळवळीत सहभागी होत आहेत. या पुस्तकांमध्ये शालेय अभ्यासक्रमाबाहेरील प्रेरणादायी आणि अवांतर वाचनासाठीची पुस्तके दिली जात आहेत.या उपक्रमासाठी अनेक मुलं ही मदती साठी पुढे येत आहे.
लेशपाल जवळगे सांगतात, बीड जिल्ह्यातील मुलांना वाचनाची सवय लावून त्यांचा दृष्टिकोन बदलायचा आहे. जे आज वाचतील, ते उद्या समाजाला दिशा देतील. वाचन संस्कृती रुजली, तर गुन्हेगारी कमी होईल आणि विचारशील समाज निर्माण होईल. बीड वाचतेय ही केवळ एक मोहीम नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचनाची सवय लावण्याचा आणि ज्ञानाचा दिवा पेटवण्याचा एक सामाजिक प्रेरणादायी उपक्रम आहे. लेशपाल जवळगे यांच्या या प्रयत्नामुळे बीड जिल्हा वाचणारा जिल्हा म्हणून ओळख मिळवेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.