पुणे : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये समोर आलेल्या 2 चिमुरडींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एक संतापाची लाट आहे. पण यासोबतच आता लैंगिक शिक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा होऊ लागली आहे.
लैंगिक शिक्षणाबाबत मुलांशी बोलणं योग्य आहे का? असा प्रश्न नेहमी पालकांना पडतो. पालक आपल्या पाल्यांना या विषयी बोलण्यास घाबरतात. याविषयी पालक मोकळेपणाने बोलत नाहीत. त्यामुळे योग्य लैंगिक ज्ञान मुलांपर्यंत न पोहचल्याने मुलं वयात आली की त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोणत्या वयात मुलांना लैंगिक ज्ञान देणे गरजेचे आहे, याविषयीची आपण जाणून घेऊयात.
advertisement
पुण्यातील मुलांचं लैंगिक शिक्षण या विषयातील तज्ज्ञ आणि समुपदेशक भाग्यश्री साळुंखे यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, लहान वयापासूनच मुलांना हळूहळू लैंगिक गोष्टींबद्दल सांगायला सुरुवात केली पाहिजे. वयाच्या 5 वर्षांपासून मुलांना थोडं फार चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याचे ज्ञान देणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
विद्यार्थ्यांना त्यांच्या शरीराबद्दल आणि तारुण्याच्या प्रारंभी त्यांच्यात कोणते शारीरिक किंवा भावनिक बदल होतात, हेदेखील पालकांनी जाणून घेणे आवश्यक आहे. समाजाची मानसिकता बदलत चालली असल्याने आपल्या मुलांना पालकांनी याविषयी जागृत करणं फार गरजेचे आहे. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श आणि शारीरिक जागरूकता याबद्दल चर्चा सुरू केली पाहिजे आणि हळूहळू लैंगिक ज्ञान सामान्य केले पाहिजे.
पालकांनी आपल्या मुलांशी बोलले पाहिजे आणि मातांना या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी सुरक्षित आणि सहाय्यक वातावरण तयार केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. मुलगा किंव्हा आपली मुलगी शिकून मोठ्ठी व्हावी, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. यावेळी त्या मुलाची नेमकी कशी काळजी घ्यायची, हे देखील पालकांनी मुलांना शिकवण गरजेचे आहे. या प्रकाराला आपली मुलं मुली बळी पडू नये, यासाठी सर्वप्रथम पालकांनी याबाबत जागृत असणे महत्वाचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.