मिळालेल्या माहितीनुसार, मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव अमोल राजू कुराडे (रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आहे. अमोल हे ऊस खाली करून आपला मोकळा ट्रॅक्टर घेऊन परतत होते. यावेळी पिंपळे पाटी परिसरात समोरून येणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रकची (क्रमांक एम.एच. ११ एल १३४१) आणि ट्रॅक्टरची समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की, काही क्षणातच दोन्ही वाहनांच्या इंधन टाक्यांचा स्फोट होऊन आग लागली.
advertisement
तरुणाने पत्नी अन् भाच्यादेखत घेतलं पेटवून, जागीच होरपळून मृत्यू, मन हेलावणारं कारण समोर
बचावकार्य आणि वाहतूक कोंडी
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले, मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की कुणालाही जवळ जाणे शक्य नव्हते. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस स्टेशनचा ताफा आणि दोन अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत चालक अमोल कुराडे यांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातामुळे बारामती-भिगवण रस्त्यावरील वाहतूक अनेक तास विस्कळीत झाली होती.
भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, क्रेनच्या साहाय्याने जळालेली वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यात आली आहेत. "या दुर्दैवी घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली. ऐन ऊस गळीत हंगामात सोलापूर जिल्ह्यातील एका तरुण चालकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नातेपुते परिसरात शोककळा पसरली आहे.
