पुणे : पुणे शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेमुळे रविवारी (19 जानेवारी) पुण्यातील प्रमुख रस्ते दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील ‘प्रोलॉग रेस’ पुणे शहरात होणार असून, त्यानिमित्त सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.
advertisement
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत जंगली महाराज रस्ता (जे.एम. रोड) आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (एफ.सी. रोड) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यासोबतच गणेशखिंड रस्ता तसेच या मुख्य रस्त्यांना जोडणारे अनेक उपरस्तेही बंद राहणार आहे.
वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल
या सायकल स्पर्धेमुळे पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. नागरिक जहांगीर चौक, आरटीओ रस्ता, बोलई चौक, मालधक्का चौक या मार्गांचा वापर करून आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतात, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच गरज नसल्यास खासगी वाहनांचा वापर टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
'या' शाळांना सुट्टी
दरम्यान, या स्पर्धेचा परिणाम शैक्षणिक संस्थांवरही होणार आहे. पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेषतः एफ.सी. रोड, जे.एम. रोड, गणेशखिंड रोड परिसरातील शैक्षणिक संस्थांना सुट्टी देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना आणि पालकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नियोजन करून घराबाहेर पडावे
सायकल स्पर्धेमुळे पुणे शहराला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळणार असली, तरी नागरिकांनी नियोजन करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. योग्य पर्यायी मार्गांचा वापर केल्यास गैरसोय टाळता येईल, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.
