मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी अनिकेत रिठे हे दोघेही एकाच आयटी कंपनीत कार्यरत आहेत. आरोपी हा टीम लीडर असून, त्याने आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिर्यादी महिलेला फोन करून "मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे, खाली ये असे सांगितले. त्यानंतर त्याने तिला कंपनीच्या आवारातील पार्किंगमध्ये बोलावून घेतले आणि स्वतःच्या कारमध्ये बसवले.
advertisement
आरोपीविरोधात पोलिस स्थानकात तक्रार
तुझे प्रमोशन करतो, पगार वाढवतो; पण त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे, असे म्हणत अश्लील मागणी करत जवळ येण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादी महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. अचानक झालेल्या या वर्तनामुळे ती महिला घाबरली अन् तिथून पळ काढला. त्यानंतर महिलेने त्वरित पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी खराडी पोलीस तपास करत आहे.
महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
या तक्रारीनंतर पोलिसांनी अनिकेत रिठे याच्याविरोधात भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. आरोपीविरुद्ध पुढील तपास करत आहे. या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कंपन्यांवर असताना अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.