अनेक औषध विक्रेते फक्त मुलाचे वय विचारून औषध देतात. काही ठिकाणी तर सर्दी-कफ एवढे सांगितले तरी औषध मिळते. या निष्काळजीपणामुळे चुकीचे औषधोपचार, झोप येणे, श्वसनाचे त्रास अशा दुष्परिणामांच्या घटनांत वाढ झाली आहे. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाकडे तपासणीसाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने या समस्येवर नियंत्रण आणण्यात अडचणी येत आहेत.
advertisement
सध्या राज्यात सुमारे 78 टक्के औषध निरीक्षकांची पदे रिक्त असून 30 लाख लोकांमागे केवळ एकच निरीक्षक कार्यरत आहे. अशा परिस्थितीत हजारो औषध दुकाने आणि दवाखान्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे जवळपास अशक्य झाले आहे. फक्त पुणे जिल्ह्यातच 8500 औषध दुकाने आणि 5700 दवाखाने कार्यरत आहेत, मात्र तपासणीसाठी केवळ 8 ते 10 निरीक्षक कार्यरत आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नवीन वर्षात स्वतंत्र भरारी पथक स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. हे पथक अचानक छापे टाकून नियमभंग करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करेल. अन्न आणि औषध प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार या पथकाद्वारे बेकायदेशीर विक्रीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होणार आहे.
दरम्यान पुणे जिल्हा पातळीवर सध्या तपासणी मोहीमही सुरू आहे. अलीकडेच 22 औषध विक्रेत्यांच्या तपासणीत 20 ठिकाणी नियमभंग आढळून आला. संबंधित विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून काहींवर परवाना निलंबनाची कारवाईही सुरू आहे.
अन्न प्रशासनाचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी सांगितले की नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. नागरिकांनी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे,असे आवाहन त्यांनी केले.