नेत्रतज्ज्ञांच्या मते, फटाक्यांमध्ये चारकोल, गंधक, नायट्रेट, क्लोरेट आणि परफ्लोरेट सारखे घटक असतात. फटाका फुटताना तयार होणारा धूर आणि रासायनिक कण डोळ्यांना जलन, दाह, जखम आणि दृष्टीदोष निर्माण करतात. दमा आणि ॲलर्जी असणाऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. त्यातच फटाके फुटताना आसपासचे तापमान वाढते, त्यामुळे क्षणात गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते.
advertisement
डॉक्टर सांगतात की, स्फोटावेळी उडणारे दगड, माती, ठिणग्या आणि धुराचे कण सर्वाधिक वेगाने बघणाऱ्यांच्या डोळ्यांवर आदळतात. त्यामुळे जखम, रक्तस्त्राव, इजा किंवा डोळा निष्क्रिय होण्याचा धोका निर्माण होतो. सुतळी बॉम्ब, रॉकेट, चक्री, अनार या फटाक्यांपासून विशेष धोका असतो. सुतळी बॉम्ब मातीच्या भांड्यात फोडल्यास उडणारे मातीचे तुकडे डोळ्यात खोलवर रुतण्याच्या घटना सर्वाधिक आढळतात, त्यामुळे अशा प्रकारची पद्धत पूर्णपणे टाळावी, असा सल्ला तज्ज्ञांचा आहे.
डोळ्याला इजा झाल्यास काय करू नये?
1. डोळे चोळू नयेत, त्यामुळे जखम वाढते.
2. कोणतीही घरगुती औषधे, आयड्रॉप स्वतः वापरू नयेत.
3. डोळ्यावर दाब देऊ नये.
तत्काळ काय करावे?
1. डोळे थंड आणि स्वच्छ पाण्याने धुवा.
2. स्वच्छ कापड हलकेच ठेवून डोळा झाका.
3. ताबडतोब नेत्ररोग तज्ज्ञांशी संपर्क साधा.
ही लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांना दाखवा
डोळा लाल होणे, पाणी येणे किंवा जळजळ, प्रकाश सहन न होणे, अचानक नजरेत बदल, डोळे सुजणे, डोळ्यात चिपड येणे, तीव्र वेदना आणि डोकेदुखी ही सर्व चिन्हे गंभीर दुखापतीची सुरुवात असू शकतात, त्यामुळे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कोणाला जास्त धोका असू शकतो?
मुलांना, वयोवृद्धांना, डोळ्यांचे आजार असणाऱ्यांना आणि काँटॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांना याचा धोका अधिक असतो. मुलांचे डोळे संवेदनशील असल्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
दिवाळी हा आनंदाचा सण आहे. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रयत्न करा. शरीराला इजा होईल अशी दिवाळी साजरी करून आनंदात भंग करण्यापेक्षा सावधानता बाळगणे कधीही चांगले, असे नेत्रतज्ज्ञ डॉ. राजोरिया यांनी सांगितले.