नेमकी घटना काय?
बुधवारी (१७ डिसेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पिंपळे निलख परिसरातील नागरिक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना पेट्रोल पंपाजवळील कचऱ्यात काहीतरी संशयास्पद दिसलं. जवळ जाऊन पाहिल्यावर तिथे कापडात गुंडाळलेले एक नवजात अर्भक दिसून आले. स्थानिकांनी तातडीने सांगवी पोलिसांना पाचारण केलं.
माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या चिमुरडीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले की, रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्या अर्भकाचा मृत्यू झाला होता. हे अर्भक स्त्रीलिंगी (मुलगी) असून, जन्मानंतर काही वेळातच त्याला तिथे सोडून देण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
advertisement
याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पेट्रोल पंप आणि आसपासच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग तपासले जात आहे, जेणेकरून बाळाला कचऱ्यात टाकणाऱ्या व्यक्तीची ओळख पटू शकेल.
परिसरातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये, प्रसूती गृहे यांची माहिती घेतली जात आहे. गेल्या २४ ते ४८ तासांत तिथे कोणत्या महिलांची प्रसूती झाली किंवा कोणती संशयास्पद प्रकरणे समोर आली, याची पडताळणी सुरू आहे. स्थानिक आरोग्य सेविका आणि आशा वर्कर्सकडून परिसरातील गरोदर महिलांच्या नोंदी तपासल्या जात आहेत. अशा प्रकारे नवजात अर्भकाला बेवारस सोडून देणे हा कायदेशीर गुन्हा असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
