प्रवाशांचा प्रवास होणार स्वादिष्ट! रेल्वेच्या जेवणात नव्या मेनूची भर
तिकीट बुकिंग करतानाच प्रवाशांना आता 'डायबेटिक व्हेज’ किंवा ‘डायबेटिक नॉन-व्हेज’ असे पर्याय निवडता येतील. त्यामुळे प्रवासादरम्यान साखरेची पातळी नियंत्रित राहील आणि कॅटरिंग सेवेत कोणतीही अडचण येणार नाही. या उपक्रमामुळे देशभरातील लाखो मधुमेही प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
डायबेटिक फूडमध्ये काय असेल?
advertisement
डायबिटीज व्हेजमध्ये डाळ, मिक्स व्हेज (बटाटा वगळून), रोटी, सॅलड आणि साखरमुक्त डेझर्ट दिले जातील. नॉन-व्हेज पर्यायात बोन्लेस चिकन करी, ग्रिल्ड फिश किंवा बॉईल्ड एग्ससोबत भाज्या असतील. नाश्त्यासाठी व्हेज कटलेट, कुलचा-चणा आणि साखरमुक्त चहा किंवा कॉफी उपलब्ध राहतील. विविध झोननुसार मेनूमध्ये काही बदल करता येणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना स्थानिक चवीचा अनुभवही मिळेल.
मधुमेही प्रवाशांची चिंता दूर
या नव्या सेवेच्या माध्यमातून डायबिटीज प्रवाशांना बाहेरील तेलकट, तुपकट किंवा साखरयुक्त अन्न टाळता येईल. त्यामुळे प्रवासात साखरेची पातळी वाढण्याचा धोका कमी होईल. रेल्वेतील हे अन्न घरगुती आणि पौष्टिक असल्याने प्रवाशांना आरोग्याची काळजी घेत प्रवासाचा आनंद घेता येईल.
तिकीट बुकिंगवेळी निवडीचा पर्याय
आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपवर तिकीट बुक करताना आता व्हेज, नॉन-व्हेज, जैन, डायबेटिक व्हेज आणि डायबेटिक नॉन-व्हेज असे पाच पर्याय दिसतील. त्यामुळे डायबेटिक फूड निवडणे अधिक सोपे झाले आहे.
कोणत्या गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध?
ही सुविधा सध्या वंदे भारत, राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या सर्व प्रीपेड गाड्यांमध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्रात मुंबई–सोलापूर वंदे भारत, सीएसएमटी–साईनगर शिर्डी वंदे भारत, पुणे–हुबळी वंदे भारत, तसेच मुंबई–दिल्ली राजधानी आणि मुंबई–हावडा दुरांतो या गाड्यांमध्ये डायबेटिक फूड दिले जाणार आहे.
या निर्णयामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेणारी संस्था म्हणून अधिक मजबूत पाऊल टाकत आहे. आता प्रवासातही आरोग्य आणि चव यांचा उत्तम समतोल राखता येणार आहे.
