मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही गुन्हे वेगवेगळे नोंदवले असून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी नगरसेविका जयश्री गावडे यांच्या बंगल्यावरून हा वाद सुरू असल्याची माहिती आहे. या बंगल्यावर ताबा घेण्यासाठी तेजस्विता कदम आणि त्यांचे काही साथीदार गेले होते. यावेळी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार तेजस्विता कदम यांनी केली होती. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी अनुप मोरे यांच्यासह अन्य आठ जणांविरूद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
आता ज्या बंगल्यात तेजस्विता कदम गेल्या होत्या. त्या बंगल्यात राहणाऱ्या माजी नगर सेविका जयश्री गावडे यांनी तेजस्विता कदम यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे. तेजस्विता कदम यांनी त्यांच्या अन्य साथीदारांच्या मदतीने, बंगल्यात घुसून सशस्त्र दरोडा टाकला. घरातील तब्बल 1 कोटी रुपये किमतीचे दागिने आणि वस्तू नेल्या, असं गावडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
एवढंच नाहीतर, पुरावे नष्ट करण्याच्या हेतुने तेजस्विता कदम यांनी आपल्या घरातील CCTV चा DVR देखील चोरून नेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी जयश्री गावडे यांनी कदम विरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली. पण माजी नगरसेविका जयश्री गावडे यांनी केलेल्या तक्रारीबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं सांगत तेजस्विता कदम यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दुसरीकडे, अनुप मोरे यांनी देखील तेजस्विता कदम यांच्याकडून केले जाणारे आरोप फेटाळून लावत, आपण घटनास्थळी नसतानाही राजकीय हेतूने प्रेरित आपल्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपमधील हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या दोन्ही प्रकरणाची स्वतंत्र्यपणे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी दिली.
