सणासुदीत नागरिकांना महावितरणचा झटका; वीजबिलात अनपेक्षित वाढ
साधारण 38 लाखांहून अधिक ग्राहकांवर याचा परिणाम होणार असून घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक सर्व वर्गांतील ग्राहकांना प्रति युनिट 35 पैशांपासून 95 पैशांपर्यंत जादा बिल आकारले जाणार आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर आलेल्या या वाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सणासुदीच्या काळात लायटिंग, आकाशकंदील आणि इतर सजावटीसाठी वीजेचा जास्त वापर होतो. मात्र, या वाढलेल्या बिलामुळे अनेकांना खर्चाचे नियोजन बदलावे लागणार आहे. महावितरणच्या परिपत्रकानुसार ही वाढ सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांसाठी लागू असणार आहे.
advertisement
दरमहा वीजदराचे समायोजन केल्यामुळे ग्राहकांना दरात चढउतार जाणवतात. सप्टेंबर महिन्यात इंधन समायोजन शुल्कात वाढ झाल्याने वीज बिलात वाढ झाली आहे. वीज कंपन्यांना बाजारातून जास्त दराने वीज खरेदी करावी लागल्यास तो अतिरिक्त खर्च ग्राहकांकडून वसूल केला जातो. त्यामुळे वापरलेल्या युनिटनुसार बिल वाढले आहे.
असे असतील नवे दर–
1 ते 100 युनिट वापरासाठी प्रति युनिट 35 पैसे वाढ
101 ते 300 युनिट वापरासाठी प्रति युनिट 65 पैसे वाढ
301 ते 500 युनिट वापरासाठी प्रति युनिट 85 पैसे वाढ
501 युनिटपेक्षा जास्त वापरासाठीही प्रति युनिट 85 पैसे वाढ
महावितरणच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे सणासुदीच्या काळातील आर्थिक गणिते बिघडली तसेच वीजदरवाढीमुळे शहरातील छोट्या व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योगांपर्यंत सर्वत्र असंतोष दिसून येतो आहे. तज्ज्ञांच्या मते इंधनाच्या दरातील चढउतार आणि उत्पादन खर्च वाढल्याने वीजदर वाढ होणे साहजिकच आहे. मात्र, ही वाढ सणासुदीच्या काळात लागू केल्याने नागरिकांना आर्थिक धक्का बसला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सजावटीपासून ते घरगुती खर्चापर्यंत सर्वत्र बचतीचा विचार करावा लागणार आहे.