पुणे : पुणे जिल्ह्यासाठी कार्यरत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या मोशी येथील कार्यालयाला लवकरच अत्याधुनिक आणि हायटेक स्वरूप मिळणार आहे. या कार्यालयात प्रयोगशाळा, प्रशिक्षण केंद्र आणि स्वतंत्र गोदाम उभारणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. येत्या मार्च महिन्यापासून प्रयोगशाळा कार्यान्वित होणार असल्याची माहिती अन्न आणि औषध विभागाकडून देण्यात आली.या नव्या सुविधांमुळे जिल्ह्यातील अन्न आणि औषध नमुन्यांची तपासणी अधिक जलद आणि अचूक पद्धतीने होणार आहे.
advertisement
पुण्यातील मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक एफडीए प्रयोगशाळेमुळे औषध, अन्नपदार्थ आणि सौंदर्यप्रसाधनांच्या तपासणी प्रक्रियेला नवा वेग मिळणार आहे. या नव्या पायाभूत सुविधांमुळे तपासणी अधिक अचूक, विश्वासार्ह आणि जलद होईल, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली.
पुणे विभागातील नमुना तपासणीला वेग येणार
मोशी येथील एफडीए प्रयोगशाळेला अत्याधुनिक बनवण्यासाठी तब्बल 23 कोटी 55 लाख रुपयांची 73 उपकरणे खरेदी करण्यात येत आहेत. यात अन्न तपासणीसाठी 38 आणि औषध तपासणीसाठी 35 प्रकारची उपकरणे असतील. या नव्या यंत्रसामग्रीमुळे नमुना तपासणी जलदगतीने पूर्ण होऊन अहवाल वेळेत उपलब्ध होणार आहेत.अन्न पुरवठा विभागाचे सुरेश अन्नपुरे यांनी सांगितले की,या नव्या सुविधांमुळे विभागाच्या कामकाजाला गती मिळणार असून, तपासणी प्रक्रियेत कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल. नागरिकांनाही या सुविधांचा फायदा लवकरच अनुभवायला मिळेल,असे त्यांनी सांगितले.
प्रयोगशाळांसाठी 250 पदांचा प्रस्ताव
अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) मोशी येथील प्रयोगशाळेचे बांधकाम पूर्ण झाले असून, ती मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.प्रयोगशाळा प्रभावीपणे चालवण्यासाठी 250 नवीन पदांचा प्रस्ताव विभागाने शासनाकडे सादर केला आहे.सध्या राज्यात एफडीएच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मोशी येथील ही चौथी प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर पुणे विभागातील नमुन्यांच्या तपासणीस मोठा वेग मिळणार आहे.