रेल्वे स्टेशनवरील ताण कमी होणार
हडपसर रेल्वे टर्मिनलवर प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा विकसित केल्या गेल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या काळात रेल्वेकडून काही विशेष गाड्या हडपसरहूनच चालवण्यात आल्या. सध्या या स्थानकावरून हैदराबाद एक्स्प्रेस आणि जोधपूर एक्स्प्रेस नियमितपणे धावत आहेत, तर रिवा एक्स्प्रेस ही नवीन गाडी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय येथून डेमू सेवा देखील सुरू असून, काही एक्स्प्रेस गाड्यांना हडपसर टर्मिनलवर थांबा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार पुढील काही महिन्यांत आणखी काही गाड्या हडपसर येथून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे स्टेशनवरील गर्दी कमी होऊन प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
advertisement
पादचारी पूल करून फलाट जोडणार
हडपसर टर्मिनलच्या विस्तारासाठी चौथा फलाट तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. या फलाटाकडे जाण्यासाठी मगरपट्टा बाजूने रस्ता तयार केला जाणार आहे. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी पहिल्या फलाटापासून चौथ्या फलाटापर्यंत पादचारी पूल उभारला जाणार आहे. सध्या चौथ्या फलाटासाठी जागा अपुरी पडत असून, त्याची विद्यमान लांबी सुमारे 450 मीटर आहे. लांबी वाढवण्यासाठी रेल्वेला आणखी 5,090 चौ. मीटर जागा संपादित करावी लागणार आहे. या कामासाठी जवळपास 40 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पुणे रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.






