पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळला आहे. गेल्या 17 महिन्यांपासून विशाल अग्रवाल जेलमध्ये आहे.लेकाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कारस्थान रचल्याचा आरोप आहे. अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी डॉ अजय तावरे चा जामीन सुद्धा न्यायालयाने फेटाळला आहे.
advertisement
भरधाव पोर्शे कारनं दुचाकीवर असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली होती. या घटनेत अपघातग्रस्त अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.19 मे 2024 रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात एका भरधाव पोर्शे कारने दोन जणांचा जीव घेतला होता. संबंधित कार चालक हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आलं होतं .
रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले
पोर्शे कार अपघात प्रकरणातील धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्याशी व्हॉट्सअॅप आणि साध्या कॉलद्वारे संपर्क साधल्याचे समोर आले होते. मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अग्रवाल आणि तावरे यांच्यात डील झाल्याचे समोर आले होते. या बदल्यात ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोरला घेऊन सॅम्पल कचऱ्यात फेकले होते. मद्यप्राशन केलेल्या मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अगरवालने कारस्थान रचले होते. 21 मे 2024 रोजी विशाल अगरवाल याला पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती.
प्रकरणाची देशभरात चर्चा
दरम्यान या अपघाताचे सीसीटीव्ही समोर आले, त्यानंतर आरोपी मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा दिल्याने प्रकरणाची देशभरात चर्चा पाहायला मिळाली होती. सोशल मीडियावर नेटकऱ्यांना हा मुद्दा लावून धरला त्यानंतर माध्यमांनी प्रकरण आणखी प्रखरपणे उजेडात आणल्याने सर्व प्रकरण उघडकीस आलं होतं.
