शनिवारवाडा परिसरात झालेल्या नमाज पठणाच्या चित्रीकरणानंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओ आणि संदेश व्हायरल झाले होते. त्यानंतर काही घटकांनी धमकीसदृश पोस्ट प्रसारित केल्यामुळे सारसबागेतील कार्यक्रमावर असुरक्षितेचे सावट आले होते. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर युवराज शहा यांनी सोमवारच्या दिवशी कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली होती. हा निर्णय पुणेकरांसाठी धक्कादायक ठरला होता कारण गेल्या 28 वर्षांपासून दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी गोवर्धन दिवाळी पहाट हा कार्यक्रम शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे.
advertisement
दरम्यान पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेतली. उपद्रवी आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या घटकांविरुद्ध तातडीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने आयोजक आणि नागरिकांना सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या सक्रिय पावलांमुळे शहरातील सांस्कृतिक वातावरणात पुन्हा आश्वासकता आणि सकारात्मकता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजक युवराज शहा यांनी पुन्हा निर्णय बदलत कार्यक्रम नेहमीप्रमाणेच आयोजित करण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की पुणे पोलिसांनी आम्हाला दिलेला आत्मविश्वास, मानसिक आधार आणि तातडीची कारवाई पाहून आम्ही कार्यक्रम पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचे ठरवले आहे. पुणेकरांसाठी हा दिवाळी पहाट हा केवळ एक कार्यक्रम नाही तर एक सांस्कृतिक सण आहे.
दरवर्षीप्रमाणे या वेळीही सारसबागेत पहाटे पारंपरिक संगीत, भजन, कीर्तन आणि उत्सवी सजावट यांची सांगड घातली जाणार आहे. पुणेकरांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि शांततेत, आनंदात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
एकूणच पाहता पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि नागरिकांच्या पाठिंब्यामुळे सारसबागेतील गोवर्धन दिवाळी पहाट हा पारंपरिक सोहळा यंदाही होणार आहे.