या फसवणुकीची तक्रार घेऊन पीडित इंजिनिअर या आठवड्याच्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवड सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे गेले. त्यांच्या अर्जाची पडताळणी झाल्यावर पोलिसांनी त्याच्या संबंधित घडलेल्या गुन्हाची तक्रार नोंदवून घेतली.
नेमके घडले तरी काय...?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणुकीची सुरुवात एका मेसेजिंग ॲप्लिकेशनवरील ग्रुपमधून झाली. गुन्हेगारांनी पीडित व्यक्तीचा मोबाईल नंबर एका ग्रुपमध्ये ॲड केला. या ग्रुपमधील सदस्य आधीपासूनच ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळत असल्याबद्दल चर्चा करत होते. ही चर्चा वाचून इंजिनिअरला कुतूहल वाटले आणि त्याने ग्रुप ॲडमिनशी संपर्क साधला.
advertisement
ग्रुप ॲडमिनने त्या व्यक्तीला एका ऑनलाइन शेअर ट्रेडिंग ॲपची लिंक दिली. त्याने ती लिंक वापरून ते ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केले. याबद्दल बोलताना पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राला सांगितले की, ''हे ॲप साधे नव्हते. फसवणूक करणारे लोक हे ॲप दूर बसूनही आपल्या मनाप्रमाणे बदलू शकत होते. याचाच अर्थ म्हणजे ते ॲपमध्ये नफा किंवा गुंतवणूक खोटी दाखवू शकत होते.
पीडित व्यक्तीने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांनी त्याला मेसेजिंग ॲप्लिकेशनवर नऊ वेगवेगळे बँक खाते क्रमांक दिले. पीडिताने याच खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली. पैसे मिळाल्यावर ते आरोपी पीडितासाठी शेअर्स खरेदी करत असल्याचा दावा करत होते. महत्त्वाचे म्हणजे ऑनलाइन ॲप्लिकेशनवर पीडित व्यक्तीला त्याची गुंतवणूक आणि त्यावर झालेला नफा दिसत होता.
फक्त काही दिवसांतच, त्या ॲप्लिकेशनवर इंजिनिअरला 6.94 कोटी एवढा नफा झाल्याचे दिसले. जेव्हा पीडित व्यक्तीने हा नफा विकून पैसे काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी नवीन मागण्या सुरू केल्या. त्यांनी शुल्क म्हणून 1.22 कोटी रुपये तर भांडवली नफा कर म्हणून ₹48.57 लाख रुपये आणि शॉर्ट-टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणून 34.70 लाख रुपये असे विविध कर आणि शुल्काची मागणी केली.
पवार यांनी पुढे सांगितले की, नफ्याची रक्कम मिळवण्याच्या आशेने पीडित व्यक्तीने या विविध शुल्कांसाठी आरोपींच्या खात्यांमध्ये अजून पैसे ट्रान्सफर करणे सुरूच ठेवले. अखेरीस पीडित व्यक्तीने 6.94 रुपये कोटींचा नफा मिळेल या आशेने आरोपींच्या नऊ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण 2.1 कोटी रुपये ट्रान्सफर केले. अशा प्रकारे या ऑटोमोबाईल इंजिनिअरला सायबर भामट्यांनी मोठा गंडा घातला.