सुमारे 6,695 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा 13.3 किलोमीटर लांबीचा मार्ग खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान तयार करण्यात आला आहे. या नव्या मार्गामुळे सध्याचे 19 किलोमीटर अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे. विशेष म्हणजे खंडाळा घाटातील धोकादायक वळणं, तीव्र चढ-उतार आणि पावसाळ्यातील दरडी कोसळण्याचा धोका टाळता येणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ वेळेचीच नव्हे तर इंधनाचीही मोठी बचत होणार आहे. अंदाजानुसार, हा मार्ग सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे 1 कोटी रुपयांचे इंधन वाचू शकते. त्यामुळे पर्यावरणीय दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
advertisement
काळाचा क्रूर घाला! पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा शेवटचा श्वास, पोटचा गोळा दवाखान्यात मृत्यूच्या दारात
मिसिंग लिंक प्रकल्पातील अभियांत्रिकी कामे ही विशेष आकर्षण ठरत आहेत. या मार्गावर 23.5 मीटर रुंदीचे दोन बोगदे तयार करण्यात आले असून ते जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी मानले जात आहेत. यापैकी एक बोगदा 1.64 किलोमीटर तर दुसरा तब्बल 8.92 किलोमीटर लांबीचा आहे. विशेष म्हणजे दुसरा बोगदा लोणावळा तलावाच्या तळापासून सुमारे 180 मीटर खाली बांधण्यात आला आहे, जे अभियांत्रिकी कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
याशिवाय टायगर व्हॅली परिसरात 650 मीटर लांबीचा आणि 182 ते 184 मीटर उंचीवर उभारलेला केबल-स्टेड पूलही या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा पूल आशियातील सर्वाधिक उंचीच्या पुलांपैकी एक मानला जात असून तो ताशी 252 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनाही तोंड देऊ शकतो.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बोगद्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात वॉटर मिस्ट अग्निशमन यंत्रणा, एएनपीआर कॅमेरे आणि लिनिअर हीट डिटेक्शन सिस्टमचा समावेश आहे. तसेच पुलाच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे.
एकूणच, मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार असून राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वाची भर पडणार आहे.






