मावळ: राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता मैदानात कोण कोण उतरणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात एकीकडे महायुतीत धुसफूस सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यभरात ठिकठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीतही महायुतीमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. पण, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीमध्ये रंगत लढत सुरू आहे. राष्ट्रवादी अजित गटाने खातं उघडत एक जागा बिनविरोध निवडून आणली. त्यानंतर आता भाजपने धमाका करत ३ जागा बिनविरोध निवडून आल्या आहे.
advertisement
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापला आहे. उमेदवार कोण कोण आहे, याची नावं आता समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने ९ उमेदवारांची पहिली यादी १३ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केली होती. आज अजित पवार गटाने १ जागा बिनविरोध निवडून आणली आहे.
तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा हा पहिला विजय आहे. प्रभाग क्रमांक ९ मधून हेमलता चंदभान खळदे बिनविरोध निवडून आल्या आहेत. आमदार सुनील शेळके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तळेगावात दमदार पहिलं खाते उघडत शक्तीप्रदर्शन केलं आहे.
तर त्यानंतर भाजपनेही आपलं पहिलं खातं हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत उघडलं आहे. भाजपने एकाच वेळी ३ जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत. भाजपचे उमेदवार दीपक भेगडे, शोभा परदेशी आणि निखिल भगत हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगर परिषदेत भाजपने आता जोरदार मुसंडी मारली आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने १७ जागांवर तर भाजप ११ जागांवर निवडणूक लढवत होती. त्यापैकी राष्ट्रवादीचा १ आणि भाजपचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. नगराध्यक्षपद हे भाजपकडे गेलं आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
