धायरी ग्रामस्थांनी घेतलेले हे निर्णय फक्त शब्दापुरते न राहता प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी गावात 17 ते 18 ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश आहे:
1. हुंडा देणे किंवा घेणे पूर्णतः बंद.
2. समाजाच्या दबावामुळे मुलींवर लग्नासाठी जबरदस्ती न करणे.
advertisement
3. गावात विशेष समिती स्थापन करून छळ झाल्यास मदत व मध्यस्थी करणे.
4. लग्नाचा खर्च कमी ठेवणे - लहान, साध्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने लग्न करणे.
5. वरात, डीजे, फटाके, अनावश्यक प्रदर्शन टाळणे.
6. साखरपुडा, हळद व लग्न एकाच दिवशी पार पाडणे.
7. प्री-वेडिंग शूट हे खासगी ठेवणे - त्याचे प्रदर्शन न करणे.
8. समुदायिक विवाह प्रोत्साहन देणे.
9. पहिल्या बाळंतपणाचा खर्च मुलीच्या वडिलांनी नव्हे, तर नवऱ्याने करणे.
10. लग्नासाठी जमीन विकू नये - शिक्षण व उद्योगासाठी पैसा खर्च करावा.
या ठरावांना ग्रामस्थांचा भरघोस पाठिंबा मिळाला असून, गावभर या नियमांचे फलक लावण्यात येणार आहेत. या निर्णयांमागे एकच उद्देश आहे, वैष्णवीसारखी दुसरी एकही मुलगी अशा परिस्थितीत सापडू नये.
मराठा समाजाने यामध्ये पुढाकार घेत ग्रामसभा आयोजित केली, जिथे समाजाच्या हितासाठी सकारात्मक चर्चा घडून आली. संपूर्ण राज्यात लगेच बदल घडणार नाही, पण अशा छोट्या गावांमधून सुरुवात झाली तर समाज नक्कीच बदलू शकतो, असे मत ग्रामस्थ राहुल पोकळे यांनी व्यक्त केले.
हा ठराव केवळ धायरी गावापुरता न राहता इतर गावांनीही अनुकरण करावा आणि सामाजिक परिवर्तनाचा भाग व्हावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.





