नेमकी घटना काय?
चिखली येथील शिवतेजनगरमध्ये राहणारे नीलेश भाऊराय नागरिक (३६) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी विनोद शंकर पवार (रा. काळेवाडी) याने नीलेश यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांची कार भाड्याने देण्यास त्यांना प्रवृत्त केले. मात्र, ठरलेल्या मुदतीत कार परत न करता विनोदने ती परस्पर गायब केली.
advertisement
पिंपरी-चिंचवड आरटीओची नवी 'MZ' सीरिज! चारचाकीसाठी आवडीचा नंबर हवाय? असा करा अर्ज
GPS मुळे फुटले बिंग: आपली कार परत मिळत नसल्याचे पाहून नीलेश यांनी गाडीत बसवलेल्या GPS यंत्रणेचा आधार घेतला. तांत्रिक तपासात त्यांना समजलं की, त्यांची कार कामशेत (मावळ) येथील आदेश कोंडरे नावाच्या व्यक्तीकडे आहे. नीलेश यांनी तात्काळ आदेशशी संपर्क साधून आपली गाडी परत मागितली.
मालकाकडेच खंडणीची मागणी: यावेळी आदेश कोंडरे याने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितलं की, "विनोद पवारने ही गाडी माझ्याकडे गहाण ठेवून पैसे घेतले आहेत." इतकंच नव्हे तर, "तुला तुझी गाडी परत हवी असेल तर मला १ लाख रुपये द्यावे लागतील," अशी धमकी आदेशने नीलेश यांना दिली. स्वतःचीच गाडी परत मिळवण्यासाठी चक्क खंडणी मागितली जात असल्याचं लक्षात येताच नीलेश यांनी पोलिसांत धाव घेतली.
चिखली पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विनोद शंकर पवार आणि आदेश कोंडरे या दोघांविरुद्ध फसवणूक, विश्वासाचा भंग आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे भाड्याने वाहने देणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
