मागील पाच वर्षांत महापालिकेने तब्बल 43,680 भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण केले आहे. चालू आर्थिक वर्षात (2025-26) ऑक्टोबर महिन्यापर्यंत 844 श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शहरात समूहाने फिरणाऱ्या भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवणं आणि रेबीजसारख्या संसर्गजन्य आजारांना आळा घालणं, हा यामागचा उद्देश आहे.
महापालिकेच्या नेहरूनगर येथील प्राणी सुश्रूषा केंद्रात दररोज सुमारे 20 श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी चार सर्जन आणि कर्मचारी नियुक्त आहेत. श्वानांना पकडण्यासाठी चार वाहनांचा वापर केला जातो. निर्बिजीकरण शस्त्रक्रियेसाठी एका श्वानामागे अंदाजे 1100 रुपये खर्च येतो. काही काळ सामाजिक दायित्व निधीतून हा खर्च केला जात होता, मात्र ऑगस्ट महिन्यापासून महापालिका स्वतः खर्च करत आहे.
advertisement
नेहरूनगर येथील महापालिकेच्या प्राणी सुश्रूषा केंद्रात भटक्या तसेच पाळीव श्वानांसाठी आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण असे दोन विभाग आहेत. बाह्यरुग्ण विभागात दररोज किमान ५० श्वानांवर उपचार केले जातात, तर आंतररुग्ण विभागात रेबीजसह संसर्गजन्य आजार असलेल्या श्वानांवर उपचार होतात. पिंपरी-चिंचवड शहरात एक लाख भटके श्वान असूनही, त्यांना सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यासाठी महापालिकेकडे सध्या एकही निवारागृह उपलब्ध नाही.
महापालिकेचे पशुवैद्यकीय उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितलं की, इतक्या मोठ्या संख्येतील श्वानांसाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. तसंच, महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना केल्या जातील असं स्पष्ट केलं आहे.
निर्बिजीकरण शस्त्रक्रिया संख्या (मागील ५ वर्षांतील आकडेवारी):
2020-21 मध्ये सर्वाधिक 21,737 निर्बिजीकरण झाले होते.
2022-23 मध्ये ही संख्या 1,421 पर्यंत कमी झाली होती, त्यानंतर ती पुन्हा वाढवण्यात आली आहे.
निर्बिजीकरणानंतर श्वानांना पाच दिवस देखभालीखाली ठेवून नंतर त्यांना सोडलं जातं.
