यात महत्त्वाचे म्हणजे दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी सुरू होत असल्याने हवेची गुणवत्ता आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाकडमधील भूमकर चौकात एक्यूआय (AQI) 315 पर्यंत पोहोचला असून फक्त एका दिवसात तो 37 अंकांनी वाढला. हिंजवडी इन्फोटेक पार्क परिसरात एक्यूआय 196 तर भोसरीत 342, निगडीत 341 आणि भूमकर चौकात 313 इतका नोंदवला गेला आहे. या आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवड शहर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक ठरत आहे.
advertisement
मेट्रोच्या कामामुळे वाढली धूळ
शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोमार्गाचे बांधकाम सध्या जोमात सुरू आहे. त्यामुळे वाकड, हिंजवडीसारख्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार वाढत्या वाहनांची संख्या, औद्योगिकीकरण आणि बांधकामांमधून उडणारी धूळ हे हवेच्या प्रदूषणाचे प्रमुख कारण ठरत आहे.
मोशीतील क्रशर प्लांटचा त्रास
मोशी आणि चोविसावाडी भागात क्रशर प्लांट सुरू असल्याने तिथे धूळ आणि आवाजाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिसरातील नागरिकांना घरात व वाहनांवर धुळीचा थर बसतो आहे. शेजारील शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांनाही या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी अनेकांना श्वसनाचे विकार आणि डोळ्यांची जळजळ जाणवू लागली आहे.
सध्या शहरातील हवा फटाक्यांचा धूर, वाहनांचा धूर आणि बांधकामातून उडणारी धूळ या तीन कारणांमुळे अत्यंत प्रदूषित झाली आहे. डॉक्टरांनी नागरिकांना घराबाहेर अनावश्यकपणे जाणे टाळण्याचा आणि बाहेर पडताना मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे आणि डोळ्यांत जळजळ अशा समस्या वाढत आहेत. महापालिकेने यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.