एमआयडीसीतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी फांद्या इतक्या वाढल्या आहेत की दिव्यांचा प्रकाश पूर्णपणे अडवला जातो. त्यामुळे रस्ते अंधारात लपून जातात आणि वाहनचालकांना तसेच पायी जाणाऱ्या कामगारांना अडचणींचा सामना करावा लागतो. या अंधारामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
फक्त अपघाताचाच नाही तर चोरट्यांचाही धोका वाढला आहे. काळोखात काही ठिकाणी चोरट्यांचा उपद्रव वाढला असून विशेषतहा महिला कामगारांना असुरक्षित वाटत आहे. कामावरून घरी जाताना किंवा शिफ्ट संपल्यावर परतताना त्यांना भीती वाटते.
advertisement
भोसरी एमआयडीसीतील टी ब्लॉक भागात पर्यावरण संस्कार उद्यानासमोरील रस्त्यावर तर पूर्ण अंधार असतो. त्यामुळे कामगारांना त्या रस्त्याने जाणे धोक्याचे ठरते. कामगारांनी वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिक नागरिक आणि कामगार यांची मागणी आहे की, प्रशासनाने तात्काळ पथदिव्यांची दुरुस्ती करून ते सुरू करावेत तसेच दिव्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी.
महापालिकेने आणि एमआयडीसी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वाढलेल्या फांद्यांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत आणि वाहनचालकांसाठी दृष्टी अडथळे निर्माण झाले आहेत. वेळेत उपाययोजना न केल्यास गंभीर अपघात घडू शकतात. नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, नियमितपणे झाडांची छाटणी करून रस्ते प्रकाशमान ठेवावेत, जेणेकरून सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होईल.