मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तन्मय याने फिर्यादी महिलेच्या भाचीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली होती. काही दिवसांतच तिचा विश्वास संपादन केल्यानंतर, त्याने तिला 'एम. परिवहन' (M-Parivahan) नावाचे एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी मोबाईलवर एक लिंक पाठवली. ही लिंक प्रत्यक्षात एक 'रिमोट ॲक्सेस' देणारे संशयास्पद सॉफ्टवेअर होते. तरुणीने त्या लिंकवरून ॲप डाऊनलोड करताच, आरोपीने तिच्या मोबाईलचा ताबा मिळवला. या तांत्रिक गैरफायद्यातून चोरट्यांनी तरुणीच्या बँक खात्याची माहिती मिळवून दोन दिवसांत ९२ हजार रुपयांहून अधिक रक्कम परस्पर वळवून घेतली.
advertisement
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने दिघी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. ही घटना १३ आणि १४ डिसेंबर दरम्यान घडली असून पोलीस आता या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहेत. अनोळखी व्यक्तीने पाठवलेली कोणतीही लिंक डाऊनलोड करणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
