वडिलांची नाराजी आणि पिंकीची मध्यस्थी
पिंकीचे वडील शिवकुमार माळी हे वरळी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते. मात्र, पक्षात सुरू असलेल्या काही घडामोडींमुळे ते अस्वस्थ होते. आपल्या पित्याची ही राजकीय अस्वस्थता पिंकीला जाणवत होती. दादांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत असताना, पिंकीने ही बाब अजित पवारांच्या कानावर घातली. जनमाणसांतील नेत्याची प्रतिमा असलेल्या दादांनीही या साध्या कार्यकर्त्याची दखल घेत तातडीने आपल्या स्वीय सहायकामार्फत शिवकुमार यांना फोन लावला.
advertisement
तो एक 'मिस कॉल' आणि शेवटचा मेसेज...
नियतीचा खेळ असा की, ज्यावेळी दादांचा फोन आला, तेव्हा शिवकुमार गाडी चालवत असल्याने तो उचलू शकले नाहीत. त्यानंतर दादांनी त्यांना मेसेज केला "मुंबईत आल्यावर नक्की भेटू!" पण काळाला हे मान्य नव्हतं. मुंबईत परतण्यापूर्वीच बारामतीच्या धावपट्टीवर दादा आणि पिंकी या दोघांचाही प्रवास कायमचा थांबला. "दादा आणि पिंकी दोघांनीही आपला शब्द पाळला नाही," असे सांगताना शिवकुमार माळी यांचे अश्रू अनावर होत होते.
8 वर्षांचा प्रवास अन् शेवटचा निरोप
पिंकी माळी गेल्या आठ वर्षांपासून एअर हॉस्टेस म्हणून काम करत होत्या. गेल्या तीन दिवसांपासून त्या अजितदादांच्या दौऱ्यावर सोबत होत्या. सकाळी उड्डाणापूर्वी त्यांनी आपल्या भावाशी संवाद साधला होता, तोच त्यांचा शेवटचा संवाद ठरला. दौरा संपवून त्या नांदेडला आपल्या गावी जाणार होत्या, पण त्याआधीच क्रूर नियतीने त्यांच्यावर झडप घातली.
कार्यकर्ता पित्याचा दुहेरी शोक
"माझी लेक गेली याचं दुःख तर डोंगराएवढं आहेच, पण ज्या नेत्यासाठी आम्ही आयुष्य वेचलं, तो राज्याचा धडाडीचा नेताही आम्ही गमावला," अशा शब्दांत शिवकुमार माळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एकीकडे पित्याची अस्वस्थता दूर करण्यासाठी धडपडणारी लेक आणि दुसरीकडे कार्यकर्त्याला साद देणारा नेता, हे दोन्ही आधार एका क्षणात निखळले आहेत.
