नेमकी घटना काय?
शिरसगाव काटा येथील एका ५६ वर्षीय तक्रारदाराची वडिलोपार्जित जमीन आहे. वडिलांनी तोंडी वाटणी करून दिलेल्या जमिनीचे सपाटीकरण करत असताना तक्रारदाराचा त्यांच्या भावाशी वाद झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर, ९ जानेवारी रोजी तलाठी कार्यालयाकडून या शेतजमिनीचा पंचनामा करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
१० हजारांची मागणी आणि तडजोड: १२ जानेवारी रोजी जेव्हा तक्रारदार तलाठी कार्यालयात गेले, तेव्हा संबंधित महिला महसूल अधिकारी वानखेडे यांनी "तुमच्या बाजूने पंचनामा हवा असेल, तर १० हजार रुपये द्यावे लागतील," अशी रोखठोक मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. तडजोडीनंतर ७ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.
advertisement
सापळा रचून अटक: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्हावरे-तळेगाव रस्त्यावरील छत्रपती संभाजीराजे चौकात सापळा लावला. तक्रारदाराकडून ७ हजार रुपये स्वीकारताना वानखेडे यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली असून, पोलीस उपअधीक्षक भारती मोरे पुढील तपास करत आहेत.
