पिंपरी चिंचवडमधील भोसरीतील छावा चौकात ही घटना घडली. रितेश घोगरे असं जखमी दुचाकीस्वाराचं नाव आहे. उड्डाणपुलावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो पलटला आणि या टेम्पोमधील लोखंडी जॉब हे उड्डाण पुलावरून खाली कोसळले. या अपघातात टेम्पोतील लोखंडी जॉब उड्डाणपुलावरून खाली फेकले गेले.
नेमकं त्यावेळी रितेश घोगरे हे आपल्या दुचाकीवरून जात होता. उड्डाणपुलावर टेम्पो पलटी झाल्यामुळे हवेत उडालेले लोखंडी जॉब खाली फेकले गेले, याचा मोठा आवाज झाला. दुचाकीवरून जाताना रितेश यांनी तो पाहिला आणि वाचण्यासाठी दुचाकी जोरात पळवण्याचा प्रयत्न केला, पण लोखंडी तुकडे हे रितेश यांच्या डोक्यात पडले. लोखंडी जॉब अंगावर पडल्यामुळे रितेश घोगरे हे जागेवरच कोसळले. घोगरे यांच्या डोक्यावर लोखंडी जॉब पडतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
डोक्याला दुखापत झाल्यामुळे रितेश गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी धाव घेऊन रितेश यांना तातडीने तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. टेम्पो चालक अनिल सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.