किरकोळ भांडणाचा क्रूर बदला
तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधार प्रथमेश आढळ आणि मृत अमनसिंग यांच्यात सप्टेंबर २०२५ मध्ये कडाक्याचे भांडण झालं होतं. या वादात प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. या अपमानाचा वचपा काढण्यासाठी प्रथमेशनं अमनसिंगला संपवण्याचा प्लॅन आखला. पण अमनसिंगला एकट्याला गाठणं अवघड जात होतं. त्यामुळे आरोपींनी हनीट्रॅपचा वापर केला. अमनसिंग इन्स्टाग्रामवर सक्रिय असल्याचे पाहून आरोपींनी एका तरुणीच्या नावाने बनावट अकाऊंट ओपन केलं. यावरून त्यांनी अमनला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. २९ डिसेंबर रोजी याच अकाऊंटवरून अमनला निर्जनस्थळी भेटायला बोलवण्यात आलं. त्यानुसार अमनसिंग भेटायला गेला अन् नकळत मृत्यूच्या सापळ्यात अडकला.
advertisement
४ तास हत्येचा थरार, शेवटची इच्छा पूर्ण करत घेतला जीव
हनिट्रॅपमध्ये अडकवल्यानंतर आरोपी अमनसिंगला घेऊन खेड शिवापूर येथील वर्तुमुख मंदिराच्या निर्जन डोंगराळ भागात गेले. तिथे हत्येपूर्वी आरोपींनी अमनचा अमानुष छळ केला. त्यांनी अमनला शेवटची इच्छा विचारली. त्याने मागितलेली बिअर आणि सिगारेट त्याला देण्यात आली. इतक्यावरच न थांबता, आरोपींनी त्याला स्वतःचा खड्डा खोदायला लावला आणि त्याला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. तो जिवंत राहू नये या भीतीने त्याला पुन्हा खड्ड्यातून बाहेर काढून सर्जिकल ब्लेडने वार केले. त्यानंतर कोयत्याने गळा चिरून आणि जड दगडाने डोके ठेचून त्याचा जीव घेतला. हा अमानुष छळ तब्बल चार तास सुरू होता.
कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
अमनसिंग घरी न परतल्याने त्याच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे बेळगाव येथून प्रथमेश आढळ, नागेश धबाले आणि एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्या कबुलीजबाबावरून ७ जानेवारी रोजी पोलिसांनी दुर्गम भागातून अमनसिंगचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शोधून काढला.
५ जणांना अटक, ११ जणांवर गुन्हा
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली असून, एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात वापरलेल्या तरुणीचा पोलीस शोध घेत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
