अनिल भोसले हे मागील साडेचार वर्षांपासून कारागृहात होते आणि अलीकडेच पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. या जामिनासाठी न्यायालयाने एक महत्त्वाची अट घातली होती की, खटल्याच्या सुनावणीच्या तारखेव्यतिरिक्त त्यांनी पुणे शहर किंवा जिल्ह्यात प्रवेश करू नये. या खटल्यातील बहुतांश ठेवीदार आणि २५३ साक्षीदार पुण्यात राहत असल्याने त्यांच्यावर दबाव येऊ नये, हा या अटीमागचा मुख्य उद्देश होता. मात्र, प्रचारादरम्यानचे व्हिडिओ समोर आल्याने विरोधी उमेदवारांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे.
advertisement
या सर्व प्रकरणावर रेश्मा भोसले यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. विरोधकांकडून केले जाणारे सर्व आरोप खोटे असून, मी एकटी महिला उमेदवार असल्याने मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अनिल भोसले यांच्यावर ‘ईडी’ने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी लवकरच अर्ज केला जाणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. पुण्यात प्रवेशबंदी असतानाही घडलेल्या या प्रकारामुळे आता न्यायालय यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भोसले यांना तीन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. बँकेतील व्यवस्थापक, भोसले, बांदल यांच्यासह सातजणांविरुद्ध पोलिसांनी 6 सप्टेंबर 2021 रोजी आठ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेवर निवडून आले. मात्र, नंतर त्यांच्या पत्नी रेश्मा या अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर भाजपच्या त्या सहयोगी सदस्य बनल्या होत्या. अनिल भोसले यांच्या घरावर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला होता. यावेळी त्यांच्या चार महागड्या आणि अलिशान गाड्या आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. लँड क्रुझर, टोयोटा, सेडान या गाड्यांची किंमत सुमारे 130 कोटी रुपये एवढी आहे. त्यांनी खरेदी केलेल्या आणखी 10 ते 12 कार पोलिसांच्या रडारवर आहेत. बँकेत 436 कोटी 44 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी या प्रकरणी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली होती.
