पुण्यात आज नेमकं काय काय बंद राहणार?
१. सर्व व्यापारी पेठा आणि दुकाने बंद
पुणे व्यापारी महासंघाने घेतलेल्या निर्णयानुसार, शहरातील सर्व छोटी-मोठी दुकाने, खाजगी कार्यालये आणि व्यापारी पेठा आज दिवसभर बंद राहतील. फत्तेचंद रांका आणि महेंद्र पितळिया यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केल्यानंतर, मध्यवर्ती पुण्यासह उपनगरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत.
२. मार्केट यार्ड आणि सर्व उपबाजार ठप्प
advertisement
अजित दादांच्या निधनाचा मोठा फटका कृषी क्षेत्रालाही बसला आहे. पुण्याचे 'मार्केट यार्ड' आज पूर्णतः बंद आहे. यात खालील विभागांचा समावेश आहे:
गूळ-भुसार बाजार: दि पूना मर्चंट्स चेंबरने पुकारलेला बंद.
फळे-भाजीपाला आणि फुले बाजार: मुख्य बाजार आवारातील व्यवहार पूर्णपणे बंद.
इतर विभाग: पान बाजार, केळी बाजार, गुरांचा बाजार, भुईकाटा केंद्र आणि पेट्रोल पंप विभागही बंद राहतील.
उपबाजार: मोशी, उत्तमनगर, मांजरी आणि खडकी येथील उपबाजारही आज सुरू होणार नाहीत.
३. शासकीय आणि शैक्षणिक संस्था
सरकारी कार्यालये: शासनाने जाहीर केलेल्या सुट्टीमुळे सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये बंद आहेत.
४. सार्वजनिक कार्यक्रम आणि सोहळे रद्द
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा ३० जानेवारीचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.
शहरातील सर्व पत्रकार परिषदा, सत्कार सोहळे आणि वाढदिवसाचे कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत.
५. राजकीय कार्यालये आणि निवासस्थाने
शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्यालय आणि शरद पवार गटाचे कार्यालय दोन्ही ठिकाणी शुकशुकाट आहे.
भोसलेनगर येथील 'जिजाई' निवासस्थान आणि गोखलेनगर येथील 'बारामती हॉस्टेल' परिसरात कडक पोलिस बंदोबस्त असून तिथे सर्व कामकाज थांबले आहे.
अत्यावश्यक सेवा (दवाखाने आणि मेडिकल) वगळता पुणे शहराचे जनजीवन आज पूर्णपणे थांबले आहे. व्यापाऱ्यांच्या मते, हा बंद म्हणजे अजितदादांनी व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या कार्याला दिलेली एक मोठी आदरांजली आहे.
