सध्या सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. यामध्ये एक नोकरी करणारी महिला बसची वाट पाहत असताना थांब्यावरच चक्क Lunges करताना दिसत आहे. व्यायाम करण्यासाठी केवळ जिम किंवा घरच हवं, हा समज या महिलेनं आपल्या कृतीतून मोडीत काढला आहे. लोकांच्या नजरा किंवा कोणाची टीका याची पर्वा न करता, बस येईपर्यंतचा वेळ वाया न घालवता तिने आपल्या व्यायामावर लक्ष केंद्रित केलं.
advertisement
भारतामध्ये सध्या मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयाचे विकार झपाट्याने वाढत आहेत. व्यायामाचा अभाव आणि बदलती जीवनशैली ही याची मुख्य कारणं आहेत. मात्र "व्यायामासाठी वेळ नाही" असं म्हणणाऱ्यांसाठी ही तरुणी एक उत्तम उदाहरण ठरली आहे. कामाच्या ताणतणावातही आरोग्याची काळजी कशी घेता येते, हे तिनं सिद्ध केलं आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव: ज्या व्यक्तीनं हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला, त्यांनी या महिलेच्या जिद्दीला सलाम केला आहे. "जिथे आहात, तिथून सुरुवात करा" असा संदेश हा व्हिडिओ देतो. विशेषतः नोकरी करणाऱ्या महिला आणि गृहिणींना आपल्या आरोग्याची धुरा स्वतःच्या हातात घेण्यासाठी या घटनेनं प्रेरित केलं आहे. आजच्या काळात तासनतास एका जागी बसून काम केल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. अशा वेळी प्रवासादरम्यान किंवा फावल्या वेळात केलेली थोडीशी हालचालही शरीरासाठी संजीवनी ठरू शकते, असं मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
