या विशेष आरासीत तब्बल 21 प्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश असून दोन हजारांहून अधिक पालेभाज्यांचा उपयोग करून गणपती बाप्पाभोवती नैसर्गिकतेने नटलेले वातावरण साकारण्यात आले आहे. पालक, मेथी, कोथिंबीर, हरभऱ्याची पानं, शेपू, लाल माठ, चाकवत, कारल्याची पानं अशा अनेक स्थानिक पालेभाज्यांमुळे संपूर्ण मंडप सुगंधित आणि आकर्षक झाला आहे.
संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुप्त अभिषेकाने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर पहाटे पाच ते दुपारी एक या वेळेत महाअभिषेक संपन्न झाला, तर सकाळी आठ ते बारा या वेळेत गणेश पूजा मोठ्या भक्तिभावाने पार पडली.
advertisement
पाटलांच्या घरात होतेय बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजा, तिसरी पिढी जपतेय परंपरा, कारण आहे खास Video
यंदाच्या चतुर्थीपासून दगडूशेठ गणपती ट्रस्टने एक नवी परंपरा सुरू केली आहे. प्रत्येक चतुर्थीला ब्रह्ममुहूर्तात एका गायक कलाकाराला बाप्पासमोर आपली कला सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात आज सुप्रसिद्ध गायक कृपा किरण नाईक यांच्या भक्तिसंगीताने झाली. पहाटे तीन ते साडेचार या वेळेत नाईक यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. ब्रह्ममुहूर्तावर बाप्पासमोर गायन सेवा सादर करण्याची संधी मिळणे हे परमभाग्य आहे, असे त्यांनी भावूक शब्दांत व्यक्त केले.
पालेभाज्यांच्या नैसर्गिक, पर्यावरणपूरक आणि अनोख्या आरासीत सजलेल्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली. भक्तिभाव, कला आणि पर्यावरणपूरकतेचा संगम साधणारा हा उपक्रम दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून मोठ्या प्रमाणावर कौतुकास पात्र ठरत आहे. संकष्टीचा हा उत्सव भक्ती आणि सांस्कृतिकतेचे अद्वितीय मिश्रण ठरला आहे.





