अशी झाली कारवाई: गुन्हे शाखेच्या युनिट ५ मधील पोलीस अंमलदार शशिकांत नाळे आणि गणेश माने यांना गुप्त माहिती मिळाली होती की, सांगली जिल्ह्यातील मिरज येथील एक सराईत गुन्हेगार पिस्तूल विक्री करण्यासाठी पुण्यात येणार आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी (१६ जानेवारी) काळेबोराटे नगर परिसरात सापळा रचला.
सापळ्यात अडकले विक्रेते आणि खरेदीदार: सांगलीहून आलेला गौस ऊर्फ निहाल गब्बर मोमीन (वय ३६) हा पिस्तूल विकण्यासाठी तिथे पोहोचला. त्याच वेळी त्याच्याकडून ही शस्त्रे विकत घेण्यासाठी खेड तालुक्यातील अजय अरुण गायकवाड (वय २७) आणि सुनील नागेंद्र जमादार (वय १९) हे दोघे तिथे आले होते. व्यवहार सुरू होण्यापूर्वीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तिघांनाही घेराव घालून ताब्यात घेतले.
advertisement
पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडे ३ गावठी पिस्तूलं आणि १३ जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा सापडला. यातील मुख्य आरोपी गौस मोमीन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याने ही शस्त्रे कोणाकडून आणली होती आणि पुण्यात त्यांचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी होणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. पुणे पोलिसांनी अमली पदार्थ आणि अवैध शस्त्रांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेतील हे एक मोठे यश मानले जात आहे.
