असा घडला थरार:
मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव मूळ येथील एक डॉक्टर शनिवारी (१० जानेवारी) रात्री आपल्या गाडीतून चालक आणि सहाय्यकासह प्रवास करत होते. इनामदारवस्ती परिसरात एका पांढऱ्या इर्टिगा कारमधून आलेल्या पाच जणांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून तिघांचंही अपहरण केलं. डॉक्टरांना मारहाण करत एका आरोपीने त्यांच्या हाताला चावा घेतल्याचाही धक्कादायक प्रकार घडला.
advertisement
१९ लाखांची वसूली आणि सुटका: आरोपींनी डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तब्बल दोन दिवस (सोमवार सायंकाळपर्यंत) आरोपींनी तिघांना ओलीस धरून ठेवलं होतं. अखेर १९ लाख रुपये रोख स्वरूपात उकळल्यानंतर आरोपींनी त्यांची सुटका केली.
या प्रकारामुळे डॉक्टर इतके भयभीत झाले होते की, त्यांनी सुरुवातीला पोलिसात जाण्यास टाळलं. मात्र, दोन दिवसांनी हिंमत करून त्यांनी उरुळी कांचन पोलीस ठाणे गाठलं. तक्रार प्राप्त होताच दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करत असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.
