कोयता घेऊन पत्नीला भेटायला आला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेऊन तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. पतीच्या या त्रासाला कंटाळून पत्नी औंध रस्त्यावरील तिच्या माहेरच्या घरी राहण्यासाठी निघून गेली होती. शनिवारी (22 नोव्हेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी पती तिला भेटण्यासाठी औंध रस्ता परिसरात गेला. टपाल कार्यालयासमोर दोघे बोलत असताना, आरोपीने पुन्हा एकदा चारित्र्याचा संशय घेऊन वाद घालण्यास सुरुवात केली.
advertisement
हा वाद विकोपाला गेला असताना, त्याने आपल्या दुचाकीच्या डिक्कीत लपवून ठेवलेला कोयता बाहेर काढला आणि पत्नीवर हल्ला केला. या आकस्मिक आणि जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.
याप्रकरणी खडकी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पतीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. सध्या पोलीस उपनिरीक्षक देठे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
