पिंपरी-चिंचवड शहरातील सेक्टर 12, स्वराज्य नगरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलावर अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मालकाच्या निष्काळजीपणामुळे घडला प्रकार
सेक्टर 12, स्वराज्य नगरी येथील B 14 मदनगड आणि B 15 जयगड या इमारतीजवळ मोकळ्या जागेत काही मुले क्रिकेट खेळत होती. त्याचवेळी, पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने धाव घेत एका चिमुकल्या मुलावर हल्ला केला आणि त्याला चावा घेऊन गंभीर जखमी केले. धक्कादायक बाब म्हणजे, श्वानाच्या मालकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला आणि हे सर्व मालकाच्या समोरच हे घडले.
advertisement
श्वान मालकावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
ज्या इमारतींमध्ये पाळीव प्राणी पाळण्यास बंदी असतानाही काही कुटुंबे नियमांचे उल्लंघन करून आक्रमक प्रजातीचे श्वान आणि मांजर पाळत आहेत. यामुळे सोसायटीतील नागरिकांना मोठा त्रास होत आहे. या गंभीर घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी श्वान मालकावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
जालन्यात कुत्र्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू
जालन्यात रक्ताच्या थारोळ्यात तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आलाय. शहरातील माऊली नगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. परी दीपक गोस्वामी (वय 3 वर्ष) असं मयत मुलीचं नाव आहे. मुलीचा मृतदेह आज सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. स्थानिकांनी तात्काळ घटनेची माहिती तालुका जालना पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मुलीच्या आई-वडिलांकडे घटनेबाबत चौकशी केली. यावेळी प्राथमिक माहितीनुसार, मुलीचा मृत्यू कुत्र्याच्या हल्ल्यात झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या घटनेची पुढील चौकशी तालुका जालना पोलीस करत आहेत