राजेश सरोज असं अटक केलेल्या ३६ वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्याच्या कुंडाख येथील रहिवासी आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
१४ आणि १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी गुरुवार पेठेतील सराफी पेढीवर डल्ला मारला होता. या चोरीत ६७ लाख ६० हजार रुपये किमतीची ७० किलोहून अधिक चांदीचे दागिने आणि ५ लाखांची रोकड असा मोठा ऐवज लंपास करण्यात आला होता. चोरीला गेलेल्या ऐवजात ६२ लाखांच्या चांदीचा समावेश होता. चोरट्यांनी तीन पोती भरून चांदी चोरून नेली होती.
advertisement
'पोती' वाहून नेण्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
चोरी केल्यानंतर आरोपींनी चांदीने भरलेली ही पोती वाहून नेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे पोलीस आरोपींच्या मागावर होते. घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी तांत्रिक तपासणी केली.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
गुन्हा केल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कपडे बदलून पुणे रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने उत्तर प्रदेश गाठले, असे तपासात समोर आले. खडक पोलिसांनी याच माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून ३६ किलो ४४२ ग्रॅम चांदी हस्तगत केली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध खडक पोलीस घेत आहे.