फक्त 8 दिवसांत घटस्फोट मंजूर
घटस्फोट झालेले दोघेही उच्चशिक्षित असून पती शिपवर काम करतो, तर पत्नी डॉक्टर आहे. 3 डिसेंबरला कौटुंबिक न्यायालयात दाखल करण्यात आलेला परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज 10 डिसेंबरला निकाली निघाला. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पती-पत्नी 18 महिन्यांहून अधिक काळ वेगळे राहत असल्यास घटस्फोटासाठी आवश्यक असलेला सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी वगळता येतो. संबंधित प्रकरणात दाम्पत्य मागील 18 महिन्यांपासून वेगळे राहत असल्याने हा कालावधी माफ करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ती मागणी मान्य करत घटस्फोट मंजूर केला. या प्रकरणात दाम्पत्याने अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
advertisement
नव्या नवरीचं भयानक कांड, पाचव्याच दिवशी केलं असं, सगळेच हैराण, बीडमध्ये खळबळ
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वाद
सुमारे 18 महिन्यांपूर्वी या दाम्पत्याचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी पतीच्या शिपवरील कामावर जाण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाले. त्यानंतर दोघे वेगळे राहू लागले. कुटुंबीयांनी दोघांमधील वाद मिटवण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरले. विवाहानंतर सुरू झालेला तणाव कायम राहिल्याने पुन्हा एकत्र येणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पतीला शिपवरील कामासाठी तातडीने जाणे आवश्यक असल्याने घटस्फोटासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने लवकर निकाली काढला. परस्पर संमतीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिली असल्याची माहिती अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांनी दिली.






