पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अवैध शस्त्रांविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये मोठी यश मिळवले आहे. गेल्या 20 दिवसांत पोलिसांनी 40 गुन्ह्यांची उकल करत तब्बल 50 पिस्तूल आणि 79 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत 45 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात अनेक सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.
45 जणांना अटक
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखांनी सक्रिय सहभाग घेतला. केवळ पिस्तूल आणि काडतुसेच नव्हे, तर पोलिसांनी धारदार आणि घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत 45 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 91 कोयते, 12 तलवारी, 4 पालघन, 6 चाकू, सुरी, आणि गुप्ती अशा एकूण 116 घातक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
advertisement
शस्त्रांसोबत व्हिडीओ टाकणाऱ्यांवर होणार कारवाई
या कारवाई दरम्यान, पोलिसांनी सोशल मीडियावर शस्त्रास्त्रांसोबत व्हिडिओ टाकणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली आहे. अशा प्रकारे सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्यांवरही कायद्याचा वचक बसवण्याचे काम पोलिसांनी केले आहे. या मोहिमेमुळे शहरात अवैध शस्त्रास्त्रांचा वापर करून गुन्हे करणाऱ्यांवर अंकुश जरब बसण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
धडक कारवाईचे नागरिकांकडून कौतुक
पुढील काळातही अशा प्रकारच्या मोहिमा सुरू राहतील, असे पोलीस आयुक्तलयाने सांगितले आहेत. यामुळे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून, गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा :
पुण्यात मेट्रोची दोन स्थानके वाढवली, पुणे-लोणावळा लोकलबाबतही मोठा निर्णय