कच्चा माल पुरवठा आणि निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यास उद्योगांना आर्थिक फटका बसू शकतो, असेही सांगितले जात आहे. याबाबत फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बटवाल यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
Pune News: युद्धाचे जगभरात पडसाद, पण इराणी पुणेकरांना काय वाटतं? पाहा Video
फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बटवाल यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाचे थेट पडसाद अद्याप उद्योग क्षेत्रावर दिसून आलेले नाहीत आणि सध्या उद्योगांचे कामकाज सुरळीत सुरू आहे. मात्र हा संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास उद्योगांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
आयात-निर्यातीमध्ये अडथळे निर्माण झाल्यास कच्च्या मालाच्या तसेच इंधनाच्या किमती वाढू शकतात. त्याचा विशेषतः सूक्ष्म, लघु उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता असून काही उद्योग अडचणीत येऊ शकतात. तसेच आखाती देशांमध्ये माल निर्यात करताना अडचणी निर्माण झाल्यास उद्योगांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
काय परिणाम होणार?
दिलीप बटवाल यांनी सांगितल्यानुसार, इराण-इस्रायल संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास उद्योग क्षेत्रावर त्याचे परिणाम दिसू शकतात. इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण होऊन उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनाची गती कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय मालाच्या डिलिव्हरीसाठी लागणारा कालावधी वाढू शकतो आणि मालवाहतुकीचे दरही वाढण्याची शक्यता आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक उद्योग कार्यरत आहेत. जिल्ह्यात 141 मोठे प्रकल्प असून 85 हजार 253 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सुरू आहेत. निर्यातीमध्येही पुणे जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. उपलब्ध माहितीनुसार, 2025-26 मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रातून सुमारे 4 लाख 685 कोटी रुपयांची निर्यात झाली. त्यापैकी सुमारे 1 लाख 6 हजार 961 कोटी रुपयांची निर्यात पुणे विभागातून झाली असून त्यातही मोठा वाटा पुणे जिल्ह्याचा आहे. त्यामुळे इराण-इस्रायल संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास उद्योग आणि निर्यातीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





