मंदोशी येथील शांताबाई सिताराम गोडे यांच्या घरात ही घटना घडली. रात्रीच्या थंडीमुळे शांताबाई गोडे, त्यांची सून जयश्री आणि नातू आरव हे घराबाहेर बसले होते. याच दरम्यान, घरातून गॅस लिकेजचा तीव्र वास येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. काय झालं हे पाहण्यासाठी लहू गोडे (शांताबाईंचा पुतण्या) घरात गेला. मात्र, अचानक मोठा स्फोट होऊन घरात वेगाने आग पसरली.
advertisement
या स्फोटाची तीव्रता खूप मोठी होती. स्फोटामुळे घरातील टी-अँगलवर (T-angle) बसवलेल्या छताची फरशी पूर्णपणे फुटली, तसेच वरच्या मजल्यावरील सिमेंटचे पत्रेही तुटले. घरातील स्वयंपाकघरातील मोठं नुकसान झालं. अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
न्याय मिळाला! पुण्यात अपघातात मृत्यू, व्यक्तीच्या कुटुंबाला 1.55 कोटींच्या भरपाईचा ऐतिहासिक निर्णय
विशेष म्हणजे, ज्यावेळी हा स्फोट झाला, तेव्हा वरच्या मजल्यावर दोन भरलेले गॅस सिलेंडर ठेवलेले होते. सुदैवाने या सिलेंडरचा स्फोट झाला नाही. या मजल्यावर राहणारे कुटुंब कामानिमित्त कल्याण येथे गेले होते. त्यामुळे ते या अपघातातून बचावले. घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्यास मदत केली आणि मोठा अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी घरातील अन्य सिलेंडर त्वरित बाहेर काढले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आग वाढली नाही.
भरपाईचे आश्वासन
या घटनेची माहिती मिळताच उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, 'शिकालो' गॅस एजन्सीचे मालक नितीन डांगे यांनी या अपघातग्रस्त कुटुंबाला झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
