शनिवारी (दि. १३) झालेल्या लोकअदालतमध्ये जिल्हा न्यायाधीश भागवत यांच्या पॅनलपुढे हा दावा तडजोडीने निकालात निघाला. यावेळी पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश महेंद्र महाजन आणि जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नेमकं काय घडलं?
नीळकंठ देशपांडे (वय ५०) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बिस्टॉल नियर (Bristol Near) या नामांकित कंपनीत कार्यरत होते आणि त्यांचा मासिक पगार सुमारे १ लाख ८० हजार रुपये इतका होता. ३१ जानेवारी २०२५ रोजी ते स्वारगेट भागातील एका पुलावरून स्कूटरवरून जात होते. यावेळी समोरून 'रॉंग साइडने' आलेल्या एका दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात देशपांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
advertisement
ससून रुग्णालयातील थरार! तलवार-पिस्तुलाने रुग्णावर जीवघेणा हल्ला; फरार 12 वा आरोपी 3 वर्षांनी अटकेत
कुटुंबियांनी दाखल केला होता २ कोटींचा दावा
मृत नीळकंठ देशपांडे यांच्या पत्नी पूजा, मुलगी श्रावणी आणि मुलगा गौरव यांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीची विमा कंपनी असलेल्या 'एचडीएफसी एर्गो' (HDFC Ergo) विरोधात दावा दाखल केला होता. मोटार अपघात न्यायप्राधिकरण (MACT) येथे १५ एप्रिल रोजी २ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यात आला होता. अॅड. अतुल गुंजाळ आणि अॅड. पांडुरंग बोबडे यांनी अर्जदारांची बाजू मांडली होती.
मृत व्यक्तीचा मोठा पगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा विचार करून ही भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. लोकअदालतमध्ये अॅड. अतुल गुंजाळ, विमा कंपनीचे वकील अॅड. सुनील द्रविड आणि विमा कंपनीचे अधिकारी रवींद्र चांगदेव जाधव यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांमुळे हा दावा तडजोडीने निकाली निघाला. अर्जदारांचे वकील अॅड. अतुल गुंजाळ यांनी 'लोकअदालतमुळे पक्षकारांना जलद न्याय मिळाल्याची' प्रतिक्रिया दिली.
