असा रचला फसवणुकीचा सापळा
मूळचे बाणेर (पुणे) येथील असलेले प्रवीण गजानन वैंडेकर सध्या कॅलिफोर्निया, अमेरिका येथे वास्तव्यास आहेत. त्यांची मावळ तालुक्यातील कुसगाव परिसरात जमीन आहे. आरोपींनी या जमिनीवर डल्ला मारण्यासाठी संगनमत करून फिर्यादीच्या पत्नीच्या नावाचे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार केले. या बनावट ओळखीचा वापर करून आरोपींनी चक्क दुय्यम निबंधक कार्यालय, वडगाव मावळ येथे खोटा खरेदी दस्त नोंदवला आणि जमिनीची विल्हेवाट लावली.
advertisement
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ही घटना ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रवीण वैंडेकर यांनी शुक्रवारी (३० जानेवारी २०२६) शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी प्रकाश गंगावणे (रा. धाराशिव), देवकुमार जाधव (रा. नांदेड), सुधीर अवसरमोर (रा. अकोला) आणि त्यांच्या एका महिला साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
बनावट व्यक्ती उभी करून आणि खोटी कागदपत्रे सादर करून जमिनीची नोंदणी कशी झाली, याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे. शिरगाव पोलीस या टोळीचा अधिक तपास करत असून, यामध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
