या पार्श्वभूमीवर एमआयडीसीने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून सुरू होणारा आणि पुढे पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा पर्यायी रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला. देहूरोडकडून तळेगाव औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करता येण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा एकमधील नवलाख उंबरे गावाबाहेरून 1.7 किलोमीटर लांबीचा सहापदरी काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला असून तो टप्पा दोनला जोडण्यात आला आहे. सध्या नवलाख उंबरे गावातून जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरूनच वाहतूक होत असल्याने येथे मोठी कोंडी निर्माण होत होती. नवीन रस्ता सुरू झाल्यानंतर गावातील वाहतुकीचा ताण कमी होईल, अशी माहिती एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता नीलेश मोढवे यांनी दिली. या टप्प्यासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
advertisement
तळेगाव टप्पा दोन आणि चाकण टप्पा दोनमधून पुढे जात हा रस्ता टप्पा पाचशी जोडला जाणार आहे. कॉर्निंग कंपनीपासून भामा नदीपर्यंत सुमारे 6 किलोमीटर लांबीचा चारपदरी काँक्रीट रस्ता विकसित केला जात आहे. या विस्तारित कामासाठीही कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
औद्योगिक विस्तारामुळे वाढलेल्या वाहतुकीचा भार कमी करून प्रवासाचा वेग वाढवणे आणि वेळेची बचत करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. उद्योग क्षेत्रातील कामगारांनीही या कामाचे स्वागत केले असून, लवकरात लवकर रस्ता पूर्ण करून वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी सुटका करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.






