गणेश नगर आणि परिसरात पाचशे मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमधून तब्बल 300 लिटर पाणी गळतीमुळे वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच वडगाव शेरी परिसरात तब्बल 40 अनधिकृत नळजोडण्या सापडल्या आहेत. यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नागरिकांनी बेकायदेशीररीत्या केलेल्या नळजोडणीमुळे पाणीपुरवठ्यातील दाब कमी होतो आणि अधिकृत वापरकर्त्यांना पुरेसे पाणी मिळत नाही.
advertisement
पुणे महानगरपालिकेत नव्याने समावेश झालेल्या 23 गावांमधील 11 गावांमध्ये व जुन्या हद्दीमध्ये गुंठेवारी दाखला न घेतलेल्या बांधकामाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने अधिकृत नळजोडणी संख्या कमी आहे. त्यामुळे भरपूर ठिकाणी अनधिकृत नळजोडणी आहे. यात महानगरपालिकेचे मोठे नुकसान होत असून, नागरिकांना प्रत्येक माणसामागे कमी पाणी मिळत आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत नळजोडणी शोधण्यासाठी अडचण येत असल्याने, पुणे महानगरपालिकेकडून भाडेतत्त्वावर रोबोट खरेदी करून पाणी गळती आणि अनधिकृत नळजोडणी शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
महानगरपालिकेने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुमारे 20 लाख रुपये किमतीचा रोबोट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या रोबोटमध्ये अत्याधुनिक सेन्सर बसवले असून, त्याच्या मदतीने भूमिगत पाईपलाइनमध्ये अडकलेली गळती, तडे आणि बेकायदेशीर जोड सहज शोधता येतील. रोबोटमध्ये कॅमेरा, चार्जर आणि लाइटची सुविधाही असेल. त्यामुळे तो अंधारातही स्पष्ट दृश्य टिपू शकेल.
किती आहे रोबोटची किंमत?
पुणे महानगरपालिकेकडून एका रोबोटची खरेदी करण्यात येणार आहे. या एका रोबोटची किंमत सुमारे 90 लाख रुपये असून, पूर्ण तीन वर्षांचा मेंटेनन्स आणि मनुष्यबळ धरून एका रोबोटची किंमत जवळपास दीड कोटींच्या आसपास आहे.