दररोज पाणीपुरवठा...
दररोज नळाद्वारे, पुरेशा दाबासह पाणीपुरवठा.. टँकर माफियांवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही. पाण्याची गळती थांबवून पाईपलाईन उन्नतीकरण आणि वेळेत दुरुस्त्या करणार असल्याचं अजित पवार यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं गेलंय.
वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल
रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणार. तसेच मिसिंग लिंक प्रकल्प आणि विकास आराखड्यातील रस्ते ठराविक कालमर्यादेत पूर्ण करणार. नव्यानं समाविष्ट गावांमध्येही शहरमानकांनुसार रस्ते उभारणार असल्याचं विश्वास अजित पवार यांनी दाखवला.
advertisement
पुणे खड्डेमुक्त शहर करणार
पुणे खड्डेमुक्त शहर करणार असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलंय. खड्डे बुझवण्यासाठी कंत्राटदाराला वेळेची मर्यादा राहणार. कामाकडे दुर्लक्ष केल्यास दंड आणि संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार. टिकाऊ रस्ते उभारण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार आहे.
स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन
स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन कामकाज नीट होणार. आज निर्माण होणाऱ्या 980 एमएलडी सांडपाण्यापैकी प्रक्रिया क्षमतेतील तफावत भरून काढत नद्यांमध्ये जाणारं प्रदूषण थांबवणार आहे. स्वच्छता ही मोहीम नव्हे, तर दररोजच्या कामातील व्यवस्था बनणार आहे, असंही अजित पवारांनी म्हटलंय.
परवडणारी आरोग्यसेवा
आरोग्यसेवा सुलभ आणि परवडणारी होणार. वॉर्डनिहाय दवाखाने, सुधारित व नवीन रुग्णालये, खाटांची वाढ, मातृसेवा, कर्करोग उपचार, बर्न वॉर्ड, आयसीयू, टेलिमेडिसिन आणि गरीबांसाठी विमा सहाय्य सेवा उपलब्ध राहणार असल्याचं अजित पवारांनी जाहीरनाम्यात सांगितलं.
मोफत PMPML बस प्रवास, मोफत मेट्रो प्रवास...
विकास हा पर्यावरणाचं नुकसान करून होणार नाही. नाले, ओढे, ड्रेनेज स्वच्छ करणं आणि हरित क्षेत्रांचं संरक्षण करणं, अतिक्रमण रोखणं, पूर व प्रदूषणावर दीर्घकालीन उपाय करणं, पर्यावरणाशी समतोल राखणं हाच विकासाचा खरा मार्ग आहे. व्यवस्था करताना सन्मान आणि स्थैर्य महत्त्वाचं आहे. पुनर्वसन सन्मानानं झालं पाहिजे. उपजीविकेचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी मोफत PMPML बस प्रवास, मोफत मेट्रो प्रवास, छोट्या घरांसाठी शून्य मालमत्ता कर सवलत आणि शिक्षण थांबू नये म्हणून मोफत टॅब्लेट्स दिले जाणार आहेत.
दरम्यान, शिक्षण हा पाया आहे. म्हणूनच 150 “पुणे मॉडेल स्कूल” उभारणार. जागतिक दर्जाचं सार्वजनिक शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुणवत्तेची हमी देणार. आज 90 टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिकू इच्छितात, त्यामुळे डिजिटल शिक्षणासाठी मोफत टॅब्लेट्स अत्यावश्यक आहेत, असं अजित पवार म्हणाले.
