नेमकी घटना काय?
मुंडे कुटुंबीय कोंढव्यातील श्रद्धानगर भागातील एका चाळीत वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा गणेश (२३) हा एका खासगी कंपनीत कामाला आहे. शुक्रवारी (९ जानेवारी) सकाळी गणेश रात्रपाळी संपवून घरी परतला, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या गणेशने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता, त्याचे आई-वडील बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले.
advertisement
दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरी मुंडे यांना गेल्या वर्षभरापासून ब्रेन ट्यूमर होता आणि त्या गंभीर आजारी होत्या. तर प्रकाश मुंडे हे चालक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी सांगितलं की, "दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ज्ञानेश्वरी यांच्या आजारपणामुळे किंवा अन्य काही कारणाने हा मृत्यू झाला आहे का, याचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल."
या घटनेमुळे श्रद्धानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, आजारपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले गेले की काही अन्य कारण आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
