जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे ग्रँड टूर 2026 निमित्त 19 जानेवारीला शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर दिवसभर वाहतूक बंदी राहणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता आणि या मार्गांना जोडणारे उपरस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रोलॉग सायकल रॅली याच मार्गावरून जाणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
या वाहतूक बदलांमुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना अडचण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांनी विशेष आदेश जारी केले आहेत. छत्रपती शिवाजीनगर–घोले रोड, विश्रामबाग वाडा– कसबा, ढोले पाटील रोड, भवानी पेठ, औंध– बाणेर, कोथरुड– बावधान, सिंहगड रोड आणि वारजे– कर्वेनगर या पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक शैक्षणिक संस्था 19 जानेवारी रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील शासकीय आणि खासगी कार्यालयांना शक्य असल्यास सुट्टी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनीही त्या दिवशी अनावश्यक प्रवास टाळावा आणि वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
