नेमकी घटना काय?
जुनी सांगवी येथील ममतानगरमध्ये राहणारा सुमीत श्रीकांत गद्रे (सोनावणे) याला रविवारी पहाटे ३:४० च्या सुमारास छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. नातेवाईकांनी त्याला तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात नेले. तिथल्या डॉक्टरांनी सुमीतची 'ईसीजी' (ECG) चाचणी केली, मात्र ती सामान्य असल्याचे सांगत त्याला हृदयविकार नसल्याचे स्पष्ट केले. डॉक्टरांनी सुमीतला केवळ पित्त आणि मळमळीची औषधे आणि वेदनाशामक इंजेक्शन देऊन घरी पाठवून दिले.
advertisement
उपचार घेऊन घरी पोहोचल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांतच सुमीत जमिनीवर कोसळला. नातेवाईक त्याला पुन्हा रुग्णालयात घेऊन गेले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयात जर तज्ज्ञ डॉक्टरांनी योग्य निदान केले असते किंवा सुमीतला ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला असता, तर त्याचा जीव वाचू शकला असता, असा आरोप आरोग्य कार्यकर्त्यांनी केला आहे.
सुमीतच्या भावाने आणि नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. अखेर सांगवी पोलिसांनी ससूनमधील तज्ज्ञांच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
